गोदावरीवरील रखडलेल्या वझूर पुलाच्या कामासह रस्त्याची दर्जा उन्नती करण्याची मागणी.

परभणी (अजमत पठाण)
जिल्ह्यातील पिंगळी-ताडलिमला-वझुर रावराजुर-मरडसगाव प्रजिमा 35 गोदावररी नदीवरील रखडलेल्या पुलाचे काम व रस्त्याची दर्जा उन्नती करुन राज्य मार्ग अडथळे दुर करुन त्वरित सुरु करावे या मागणीचे निवेदन वझूर पसिरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण, व पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना देऊन साकडे घातले आहे.
2017 वर्षात थाटामाटात उद्घाटन झालेले राजूर-वझूर गोदावरी नदीवरील पुलाचे काम रखडलेले आहे. अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. आता जिल्ह्यातील पालकमंत्री असल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी बोर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी दिवंगत गंगाधर पवार यांचे बंधू लक्ष्मणराव पवार, डॉ.केदार खटींग, अॅड.अशोकराव शिंदे, प्रल्हाद पवार, गोपाळराव पवार,निलेश पवार यांनी निवेदन दिले.
तांत्रिक अडचण दुर करून लवकर कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.निवेदनात म्हटले आहे की, वझुर (ता.पुर्णा) व रावराजुर (ता. पालम) दोन्ही गावच्या मध्यभागातून गोदावरी नदीच्या पात्रात पुलाचे काम चालु आहे. दिनांक 6 मार्च 2019 रोजी कार्यारंभ आदेश होऊन 4 वर्षाहुन अधिक काळ उलटला आहे अद्याप काम पुर्ण झाले नसुन पुलाअभावी ग्रामस्थांचे अतोनात नुकसान होत आहे व अनेक अडचनींना सामोरे जावे लागत आहे.
हा पूल 1954 नागपूर प्लाननुसार मंजुर आहे. परभणी 222 (नवीन 61) ते लातुर राष्ट्रीय महामार्ग 161 होणार असून यामुळे दोन जिल्हयातील 48 किमी अंतर कमी होणार आहे. गंगाखेड, परळी, अंबाजोगाई शहर ओलांडून वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ बचत होईल. या मार्गीने अंतर अंदाजे 165 किमी आहे. या तुलनेत त्रिधारा येथून पिंगळी, वझुर, रावराजुर, मरडसगाव, बनवस, माळेगाव, अहमदपुरमार्गे लातुर 117 कि.मी. अंतर आहे यामुळे इंधनासहित वेळेची बचत होईल.
आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्य सीमा जवळ पडतील.तसेच या मार्गावर 100 हुन अधिक गावे वाहतुक होऊन दळणवळण सोयीस्कर होईल व उद्योगधंदे शेतीला पुरक व्यवसाय, मुख्य बाजारपेठ, शेतमाल खरेदीविक्रीसाठी सोयीस्कर होऊ शकते. पिंगळी (बा) पद्मावती वझुर व बनवस या मार्गावर परभणी जिल्हा प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थळ, तीर्थक्षेत्र ज्यामध्ये प्राचीन मंदिरे असुन स्थापत्यकला, मूर्तीकला, वास्तुकला पाहायला मिळतात.
पर्यटनाला चालना, ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, कृषी पर्यटन, शैक्षणिक पर्यटन होऊ शकते.या पुलाचे काम पूर्ण झाल्यास डिग्रस बंधा-यात पाणी साठवणुक क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध होईल म्हणून या मागण्या करण्यात आल्या आहेत.