शेतकर्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा

परभणी (अजमत पठाण)
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी परभणी येथे मंगळवारी (दि.18) सकाळी मोंढा मार्केट कमिटीपासून निघालेला मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष यांना मागण्याचें निवेदन देण्यात आले.
या मोर्चात असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
पिकविमा नुकसान भरपाई देण्यास जाणीवपूर्वक विलंब करप्न कायदेभंग केल्याबद्दल आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकावे.
जिल्हयातील लाखो शेतकर्यांचे आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीकडे खरीप हंगाम 2024 मधील थकलेली 25 टक्के अग्रीन पिक विमा नुकसान भरपाई, स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान अंतर्गत भरपाई व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई अशी एकूण 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आठ दिवसांत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. शेतकर्यांंप्रति उदासीन असलेल्या प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निलंबित करून पूर्णवेळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी.
खरीप हंगाम 2024 मध्ये जिल्ह्यातील शेवटच्या शेतकर्याने उत्पादित केलेले सोयाबीन खरेदी होण्याकरिता ऑनलाइन नोंदणी नव्याने सुरू करून संपूर्ण सोयाबीन खरेदीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. पंतप्रधान पिक विमा योजनेत कोणत्याही सुधारणा करण्यापूर्वी प्रत्येक जिल्हयातील शेतकर्यांना विश्वासात घेण्यात यावे आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत.