मेघना बोर्डीकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार!

शपथविधीच्या सोहळ्याकडे जिल्हावासीयांचे लक्षमहायुतीच्या पदाधिकार्यांना श्रेष्ठींद्वारे निमंत्रणे : काही पदाधिकारी रवाना.
जिंतूर (अजमत पठाण):- विधानसभा निवडणूकीतून प्रचंड बहुमत प्राप्त केलेल्या महायुतीचे सरकारचा आज मंत्रीमंडळ विस्तार होणार या मंत्रीमंडळात आमदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळ लागेल असे स्पष्ट संकेत आहेत दरम्यान, या संपूर्ण सोहळ्याकडे अन्य जिल्ह्यांप्रमाणे या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरीकांचेसुध्दा पूर्णतः लक्ष केंद्रीत झाले आहे.

या निवडणूकीत महायुती की महाविकास आघाडी सरकार सत्तारुढ होणार या विषयी निकालाच्या पूर्वसंध्येपर्यंत सर्वसामान्य नागरीकांमध्ये कमालीची उत्कंठता होती, परंतु मतमोजणीतून हळूहळू चित्र स्पष्ट होवू लागल्याबरोबर महायुतीच प्रचंड बहुमताने सत्तेवर येणार हे निश्चित झाले. त्यामुळेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींसह अन्य नेतेमंडळी व सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण संचारले होते, गल्लीबोळापासून राजधानी मुंबईपर्यंत महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करीत तसेच ढोल ताशांवर बेफाम नृत्य करीत प्रचंड आनंदोत्सव साजरा केला होता. विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले.
विजयाचा जल्लोष एक-दोन दिवस सुरु होता. त्या पाठोपाठच नवनिर्वाचित आमदारांनी मुंबईत धाव घेवून श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या. एकमेकांना शुभेच्छा दिल्या अन् विधीमंडळातील नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीच्या आयोजनाविषयी कानोसाही घेतला. परंतु, महायुतीतील पक्षश्रेष्ठींनी राज्य मंत्रीमंडळातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या एकंदरीत हिस्सेदारीसह नियुक्त्यांसंदर्भात कमालीची गोपनियता बाळगली होती. मुंबई पासून ते राजधानी दिल्ली पर्यंत बैठकांच्या फेर्या सुरु झाल्या. तेव्हा माध्यमांनी वेगवेगळे तर्क-वितर्क लढवून वातावरण गरमा गरम करण्याचाही प्रयत्न केला होता.
दुर्देवाने एकंदरीत तीनही पक्षांची हिस्सेदारी व मंत्रीपदांसाठीच्या नावांच्या निश्चिततेबाबत माध्यमांना ओळीनेसुध्दा कोणतीही खात्रीलायक माहिती आजपर्यंत कळली नाही. त्यामुळेच राजधानी मुंबईपासून परभणीतील गल्लीपर्यंत महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांत व सर्वसामान्य नागरीकांमध्ये कमालीची उत्कंठता निर्माण झाली होती.
5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार हे जाहीर झाल्याबरोबर महायुतीतील कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला व त्या सोहळ्यावर लक्ष केंद्रीत केले. महायुतीतील स्थानिक नेते व महत्वाच्या कार्यकर्त्यांना श्रेष्ठींद्वारे या शपथविधी सोहळ्याची निमंत्रणे सुध्दा धडकली तेव्हा नेतेमंडळींसह कार्यकर्ते कमालीचे सुखावले होते. या यादीमध्ये संत-महंतांनासुध्दा या सोहळ्याकरीता आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते.या जिल्ह्यातून महायुतीतील तीनही घटक पक्षातील नेतेमंडळींसह निमंत्रीत पदाधिकारी व काही कार्यकर्ते मुंबईस प्रस्थान केले होते.
जिल्ह्यास मंत्रीपद मिळावे हीच अपेक्षा….
विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या तीन प्रमुख पक्षांच्या महायुतीने सर्वदूर प्रचंड यश पटकावल्याने व या जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने राजकीय वर्तूळासह जिल्हावासीयांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यास महायुती असो, महाविकास आघाडीने मंत्री मंडळात स्थान दिले नाही. त्याआधीसुध्दा तब्बल पाच वर्षे महायुतीने जिल्ह्यास मंत्री पदाबाबत झुलवत ठेवले होते. त्यामुळेच जिल्हावासीयांच्या अपेक्षांचा भंग झाला. त्यातच अन्य जिल्ह्याच्या मंत्र्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सातत्याने सुपूर्त केल्या गेल्याने व त्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याकडे, विकास प्रश्नांकडे ढूंकूनसुध्दा न पाहिल्याने जिल्हावासीयांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होवू लागला होता. परंतु, महायुती असो, महाविकास आघाडी सरकारने जिल्हावासीयांची याही स्थितीत दखल घेतली नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने श्रेष्ठींवर या अनुषंगाने दबाव टाकण्याची धमकसुध्दा दाखविली नाही.
या पार्श्वभूमीवर आता पुन्हा या जिल्हावासीयांना मंत्रीमंडळात तीघा नवनिर्वाचित आमदारांपैकी एकास सामावून घेतले जाईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मंत्रीपद निश्चितच भेटेल, अशी अपेक्षा जिल्हावासीय बाळगून आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार म्हणून डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासह समर्थकांच्यासुध्दा अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकंदरीत दिग्गज मंडळींच्या स्पर्धेत विटेकर यांचे नाव मंत्रीपदासाठी टिकेल का? हा प्रश्नच आहे. तर महायुतीतील तीन्ही घटक पक्षांच्या मंत्री पदाच्या हिश्शेदारीत राष्ट्रीय समाज पक्षास मंत्री पदाचा हिस्सा मिळेल का? हाही प्रश्नच आहे.
यामुळेच आमदार सौ. साकोरे-बोर्डीकर यांचे नाव आघाडीवर आहे.नव्हे या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले अशी माहिती हातीआली आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांना त्याअनुषंगाने मोठ्या अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे सौ. साकोरे या दुसर्यांना निवडून आल्या आहेत. फडणवीस यांच्या वर्तूळातील आमदार म्हणून त्या सुपरिचित आहेत. त्यामुळेच समर्थकांना खात्री वाटू लागली आहे.