डिजिटल माध्यमातून मतदारांनी घेतली मतदान करण्याची शपथ.

मतदार जनजागृती पथकाचे विशेष योगदान.
जिंतूर (अजमत पठाण) :-
दिनांक 18 नोव्हेंबर रोजी जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वच भागांतील मतदारांनी मतदान करण्याची शपथ डिजिटल माध्यमातून घेतली. भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे उपजिल्हा अधिकारी निवडणूक विभाग जनार्धन विधाते, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार जिंतूर तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, तहसीलदार सेलू तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ शिवाजी मगर, मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे व शितल कच्छवे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे.
लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो.
त्याप्रमाणे सर्व मतदारांनी उत्सव लोकशाहीचा, अभिमान देशाचा अशी भावना मनात ठेवून लोकशाही बळकट करण्यासाठी दिनांक 20/11/2024 रोजी सकाळी 07 ते संध्याकाळी 06 या वेळेत सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. एकूणच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून मी मतदान करणारच अशा आशयाचे स्टिकर्स, सेल्फी पॉईंट, स्वाक्षरी मोहीम, मानवी साखळी तयार करणे, विविध सार्वजनिक ठिकाणी यामध्ये एसटी बस स्टॅन्ड, नगरपालिका घंटागाडी या ठिकाणी मतदार जनजागृती जिंगल्स लावणे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदार जनजागृती कविता, गीत, घोषणा, यासोबत डिजिटल माध्यमातून मतदारांना मतदान करण्याची शपथ देण्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करणे यासारखे विविध प्रयत्न करण्यात आले.
यासाठी सर्व वरिष्ठांच्या सूचनानुसार स्वतः स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले स्वीप पथकातील सदस्य साहित्यिक मयूर जोशी व राजेंद्र ढाकणे विशेष मेहनत घेताना दिसत आहेत. मतदार जनजागृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती, सर्व विशेष शिक्षक, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी द्वितीय सत्राच्या पहिल्या दिवशी दि. 18/11/2024 तालुक्यातील सर्व शाळेत मतदार जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.